
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डोनगाव शिवारातील हॉटेल रायबासमोर प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. पुनगाव, ता. चोपडा, ह.मु. चंदु आण्णा नगर, जळगाव) यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने बंदुकीने गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने यावल पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न प्रकरणाचा यशस्वी तपास करत पाच आरोपींना जेरबंद केले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत अधिक असे की, प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. पुनगाव, ता. चोपडा, ह.मु. चंदु आण्णा नगर, जळगाव) यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने बंदुकीने गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. ही घटना यावल तालुक्यातील डोनगाव शिवारातील हॉटेल रायबासमोर १० जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर हल्लेखोर आपल्या साथीदारासह मोटरसायकलवरून पळून गेला होता. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली. पथकाने तांत्रिक विश्लेषण वापरून गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न केले. त्यानंतर, आरोपींच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे आणि जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वात तीन वेगवेगळी पथके नाशिक, उमटी आणि अडावद येथे रवाना करण्यात आली. या पथकांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी दर्शन रविंद्र देशमुख (वय २५, रा. देशमुख वाडा, अडावद, ता. चोपडा), गोपाल संतोष चव्हाण (वय २५, रा. सोनार गल्ली, मेन रोड, अडावद, ता. चोपडा) यांना नाशिक येथून ताब्यात घेतले.
त्याचबरोबर, किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०, रा. सोनु निलाई प्लाझा, मेन रोड, कोल्हे हिल्स, बाघ नगर, जळगाव), विनोद वसंतराव पावरा (वय २२, रा. अमलवाडी, ता. चोपडा) आणि सुनील सुभाष पावरा (वय २२, रा. उमटी, ता. चोपडा) यांना अडावद, अमलवाडी आणि उमटी येथील त्यांच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणून त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि वाहन जप्त
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र (बंदूक) आणि मोटारसायकल जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.
यशस्वी कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे (यावल पो.स्टे.), सपोनि अजयकुमार वाढवे (यावल पो.स्टे.) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वलटे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार तसेच यावल पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.



