Home Cities यावल बालविवाह विरोधी लढ्यात शिक्षण संस्थांची आघाडी  

बालविवाह विरोधी लढ्यात शिक्षण संस्थांची आघाडी  


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मारूळ येथील आयडियल उर्दू हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलनासाठी विशेष जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाबाबतची साक्षरता वाढविण्यासाठी आणि समाजात या कुप्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी शाळेच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सय्यद बशारत अली होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव सय्यद इमरान अली उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अश्फाक शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांना उद्देशून बालविवाहाच्या पार्श्वभूमीवर आपले विचार मांडले.

महिला व बालकल्याण विभाग, युनिसेफ आणि एसबीसी-3 यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या ‘सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्पा’अंतर्गत जिल्ह्यातील ७५ निवडक शाळांमध्ये ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. याचाच भाग म्हणून आयडियल उर्दू हायस्कूलमध्ये हे सत्र घेण्यात आले.

या कार्यक्रमात साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या प्रशिक्षित प्रतिनिधींनी – आरती मोरे व छाया कोळी यांनी – विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सत्रात बालविवाहाचे सामाजिक, मानसिक आणि कायदेशीर दुष्परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, लैंगिक छळासंबंधी जागरूकता निर्माण करत संबंधित हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली.

विद्यार्थ्यांसाठी रचनात्मक उपक्रम आणि संवादात्मक सत्रांद्वारे विषय अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतसाठी शाळेतील शिक्षिका अफरोज सय्यद, संजीदा तडवी यांचा विशेष सहभाग होता. त्यांनी उपस्थित मार्गदर्शकांचे सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

शाळेचे मुख्याध्यापक अश्फाक शेख यांनी आपल्या भाषणात समाजात शिक्षकांची भूमिका ही केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता, सामाजिक जबाबदारी पार पाडणारी असावी, असे मत व्यक्त केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या आयोजनात सय्यद इसाक जामीन अली यांनी शासनाचे आभार मानले की, त्यांनी आयडियल उर्दू हायस्कूलसारख्या ग्रामीण भागातील शाळेची निवड केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख जमीर, अश्फाक अहमद, नूरुल हूदा, सय्यद फुरकान, सय्यद रहमत अली, सय्यद इरफान, सय्यद रिजवान व मेयार अहमद यांनी मेहनत घेतली.


Protected Content

Play sound