कंडारी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रावण महिन्यातील पवित्र दिवशी बजरंग चौक, कंडारी येथून उमाळा येथील प्रसिद्ध उमामहेश्वर महादेव मंदिराकडे एक भव्य कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात काढण्यात आली. बजरंग सेना समिती कंडारी आणि समस्त ग्रामस्थांनी या यात्रेचे आयोजन केले होते. सकाळी बजरंग चौकात महिला आणि पुरुषांची अलोट गर्दी जमली होती. भगव्या वस्त्रात आणि हातात पवित्र कावड घेऊन शिवनामाचा गजर करत निघालेल्या या यात्रेने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
या कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि ‘हर हर महादेव’, ‘जय भोले’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे, या यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिला भाविकांनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभाग नोंदवला.

या भव्य कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी हर्षल भाऊ बाविस्कर, शैलेश दादा पवार, संजेश भाऊ देशमुख, छगन परदेशी, उमेश चिंचोले, कैलास भाऊ परदेशी, विकी काळे, किशोर जाधव, उमेश भाऊ जाधव, रवी धनगर, राहुल पवार, उमेश महाजन, विकास वंजारी, मल्हार धनगर, सोन्या जाधव, आकाश सपकाळे, अविनाश सपकाळे, अंकित निकम, सिद्धार्थ सोनवणे, संघर्ष सोनवणे, कल्पेश कोळी, राहुल कोळी, चंदू भाऊ भील आणि चेतन सोनवणे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळेच ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भाविकांना रस्त्यात पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
उमामहेश्वर मंदिरात पोहोचल्यावर सर्व भाविकांनी शिवशंकराच्या पिंडीवर पवित्र जल अर्पण करून अभिषेक केला. यावर्षीची कावड यात्रा ही एकता आणि भक्तीचे प्रतीक ठरली, ज्यामुळे धार्मिक उत्साह आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.



