Home राजकीय रावेरचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील भाजपमध्ये दाखल

रावेरचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील भाजपमध्ये दाखल


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांनी आज आपल्या सौभाग्यवती तसेच सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून जळगावात त्यांचा हा प्रवेश सोहळा पार पडला.

जळगावात जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे, पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकुमार महाजन, डॉ. केतकीताई पाटील आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यात रावेर येथील माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांनी आपल्या पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे ना. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वागत केले. यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन, जनाबाई महाजन, तुषार मानकर आदींसह अन्य मान्यवरांनी देखील याप्रसंगी भाजपमध्ये प्रवेश केला.

येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून याआधी भारतीय जनता पक्षातील मान्यवरांचा प्रवेश हा लक्षणीय मानला जात आहे. शीतल पाटील हे राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असून त्यांच्या रूपाने रावेर नगरपालिकेसाठी भाजपला उत्तम चेहरा मिळाल्याचे मानले जात आहे. तर गोंडू महाजन हे देखील राजकारण व सहकारात मोठे नाव असून त्यांचा देखील भाजपला लाभ होऊ शकतो. भाजपचे हे बेरजेचे राजकारण आगामी निवडणुकीत महत्वाचे ठरणारे असून ते आमदार अमोल जावळे यांच्या वर्चस्वाला बळकटी देणारे ठरणार आहे.


Protected Content

Play sound