
सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांत पाटील आणि रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या प्रयत्नातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे प्रशासन थेट गावागावात पोहोचून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

तांदलवाडी येथील श्रीराम मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडणार आहेत. महसूल विभागासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे . शिबिरात शेतकरी, महिला, कामगार, युवक, वृद्ध व दिव्यांग यांना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. लाभार्थ्यांना ७/१२, ८अ उतारे, उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्रे, वृद्धापकाळ पेन्शन, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, शेतजमिनीच्या मोजणी संबंधित तक्रारी आदी विषयांवर आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरांत प्रशासनाकडून नागरिकांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करत अनेक प्रकरणांची त्वरित नोंद घेतली जाणार आहे. हे शिबीर म्हणजे केवळ शासकीय सेवा पुरविण्याचे माध्यम नव्ह, तर ते एक लोकाभिमुख उपक्रम ठरणार आहे. विविध गावांमधून – तांदलवाडी, मांगलवाडी, बलवाडी, भांबलवाडी, सिंगत, गाते, सुनोदा, वाघोदे खु., शिंगाडी, पुरी, गोलवाडे, खिर्डी बु. व खिर्डी खु. येथून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजना आणि सेवा जनतेच्या दारी पोहोचवणे आणि त्यांच्या अडचणींवर स्थायी उपाय करणे हा आहे. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि महिलांनी शिबिरासाठी सक्रिय सहभाग घेणार आहेत.



