सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ-खंडवा प्रस्तावित ३/४ रेल्वे लाईनमुळे गहूखेडा (ता. रावेर) व भुसावळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन होणार असल्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आपली शेती वाचवण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट घेतली असून त्यांनी सदर रेल्वे लाईन प्रकल्पाच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे.
या भेटीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, व्यथांची आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून संभाव्य नुकसानाची सविस्तर माहिती रक्षाताई खडसे यांना दिली. प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असून, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावर रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले व संबंधित रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांनी लेखी निवेदन सादर करत त्यांच्या भावना मांडल्या. आमदार पाटील यांनी या विषयात सकारात्मक भूमिका घेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, शेती व पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी हा प्रस्ताव पुन्हा विचाराधीन आणला जाईल.
या घडामोडींमुळे शेतकरी बांधवांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. प्रस्तावित रेल्वे लाईनच्या मार्गामुळे होणाऱ्या संभाव्य भूसंपादनाच्या विरोधात आता शेतकऱ्यांची मागणी अधिक ठाम झाली आहे. एकीकडे विकासासाठी रेल्वे लाईनची गरज असली तरी, दुसरीकडे जीवनावश्यक शेती व निसर्गाचे संरक्षण हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचा ठाम संदेश या शेतकरी आंदोलनातून पुढे आला आहे.



