Home Cities जळगाव माजी नगरसेवक मनोज चौधरी भाजपमध्ये दाखल 

माजी नगरसेवक मनोज चौधरी भाजपमध्ये दाखल 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील दोन टर्ममध्ये ठसा उमठवणारे माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. या पक्षप्रवेशामुळे जळगाव शहरात नवीन राजकीय समीकरणं घडतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मनोज चौधरी यांनी पूर्वी दोन पंचवार्षिक काळात नगरसेवक म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे ते जनतेत लोकप्रिय राहिले आहेत. त्यांनी एकदा विधानसभा निवडणूक देखील लढवली होती, मात्र त्या वेळी यश मिळाले नाही. त्या पराभवानंतर त्यांनी काही काळ राजकीय क्षेत्रापासून अलिप्तता स्वीकारली होती. सध्या ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. आता पुन्हा राजकीय पुनरागमन करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.

आज ब्राह्मण संघ सभागृहात आयोजित कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज चौधरी यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

मनोज चौधरी यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी केवळ एक नेता मिळवण्यापुरता मर्यादित नसून, स्थानिक पातळीवर पक्षाचे बळ वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. त्यांच्या कार्याचा अनुभव आणि जनसंपर्काचा प्रभाव लक्षात घेता, आगामी महापालिका निवडणुकीत ते भाजपचा बालेकिल्ला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या पुनरागमनाने निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound