Home Cities अमळनेर  होमगार्डला मारहाण करणाऱ्यास तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

 होमगार्डला मारहाण करणाऱ्यास तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डला मारहाण करणाऱ्या आरोपीस अखेर तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर शहरातील सुभाष चौक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. न्यायालयाने या प्रकरणी आरोपीस दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे.

घटनेनुसार, 2020 मध्ये अमळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 663/2020, सेशन केस नंबर 08/2021 अन्वये आरोपी ईस्माईल जहुर पठाण उर्फ ईस्माईल खड्डा (वय 29, रा. पानखिडकी, जिनगर गल्ली, अमळनेर) याने सुभाष चौक येथे वाहतूक नियंत्रण करत असलेल्या होमगार्ड दिलीप मराठे व पोलीस कर्मचारी ललित पाटील यांच्यावर अचानक अरेरावी करत मारहाण केली होती. “तु कोण? पोलीसांचा ड्रेस का घातला? आयकार्ड दाखव!” अशी दमबाजी करून आरोपीने दिलीप मराठे यांच्या कानशिलात मारून त्यांच्या शर्टाची कॉलर पकडत धक्काबुक्की केली होती. त्याचप्रमाणे ललित पाटील यांच्या कॉलरलाही धरून हात उगारत धावून गेल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला होता.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 353 (शासकीय कामात अडथळा), 332 (शासकीय कर्मचाऱ्यास दुखापत देणे) आणि 504 (उत्तेजित करून शांतता भंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचे कामकाज अमळनेर न्यायालयात मा. तदर्थ व अति. जिल्हा न्यायाधीश श्री. एल. डी. गायकवाड यांच्या न्यायासनावर पार पडले. खटल्यात सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी आणि होमगार्ड यांच्यासह एकूण 6 साक्षीदारांची तपासणी करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले.

त्याआधारे न्यायालयाने आरोपी ईस्माईल खड्डा यास भा.द.वि. कलम 353 अंतर्गत 3 महिने सश्रम कारावास व 2000 रुपये दंड, तर कलम 332 अंतर्गत 3 महिने सश्रम कारावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्याच्या कार्यवाहीसाठी अमळनेर पोलीस स्टेशनचे केस वॉच व पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पीएसआय उदयसिंग सांळुके (पारोळा), पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर), पो.कॉ. भरत इशी (मारवड) आणि पो.कॉ. सतीष भोई (अडावद) यांनी मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound