जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष उत्साहात पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावर आयोजित गौरव समारंभात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून जनसेवेसाठी समर्पित प्रशासनाचा आदर्श मांडण्यात आला.
कार्यक्रमास जलसंपदा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विविध महसूल पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

सन्मानित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, लघुलेखक, महसूल सेवक, शिपाई, पोलिस पाटील, कोतवाल आदींचा समावेश होता. विशेषत: नायब तहसीलदार राहुल सोनवणे, प्रीती लुटे, रमेश देवकर, संदेश निकुभ, राहुल वाघ, आर. डी. पाटील, देवेंद्र भालेराव, प्रशांत धमके यांच्यासह अनेक सहायक महसूल अधिकाऱ्यांनी नॉन-क्रिमीलेयर तपासणी, लोकसेवा हक्क कायदा, रोजगार हमी योजना, आपत्ती व्यवस्थापन, भू-संपादन प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक योगदानामुळे नागरिकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि प्रभावी प्रशासकीय अंमलबजावणी शक्य झाली आहे, हे या सोहळ्यात अधोरेखित करण्यात आले. सन्मानित कर्मचाऱ्यांनी विविध सरकारी योजना शेतकरी, गोरगरीब व गरजूंंपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे कार्य केले आहे. त्यांचे हे योगदान शासनाच्या कार्यक्षमतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतिक आहे.
महसूल दिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘महसूल सप्ताहा’दरम्यान महसूल विभागामार्फत विविध जनहित उपक्रम, शिबिरे, माहिती सत्र व सेवा जनतेच्या दारात पोहोचवण्याचे विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत लोकाभिमुखता आणि सेवा परिपक्वता अधिक बळकट करण्यासाठी अशा सन्मान सोहळ्यांचे आयोजन प्रेरणादायी ठरत आहे.



