Home Cities जळगाव प्रधानमंत्री किसान योजनेचा २० वा हप्ता उद्या वितरीत होणार

प्रधानमंत्री किसान योजनेचा २० वा हप्ता उद्या वितरीत होणार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता उद्या दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी देशभर वितरित होणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील बनोली येथून केंद्रीय स्तरावर या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असून, या दिवशी ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना योजनेची माहिती, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रांची जाणीव व योजना प्रभावीपणे कशी राबवता येईल, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोशल मिडिया, मुद्रित माध्यमे तसेच विविध IEC (Information, Education and Communication) उपक्रमांद्वारे ही माहिती सर्वदूर पोहोचवली जात आहे. यामागील उद्देश हा की, कोणताही पात्र शेतकरी योजनेंतर्गत लाभापासून वंचित राहू नये.

या विशेष दिवशी जळगाव जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० वाजता ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रम होणार असून, याचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी माहितीपर सादरीकरणे, योजना मार्गदर्शन सत्र, अडचणी व उपायांवर सुसंवाद तसेच थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना पारदर्शक व प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन धोरणात्मक उपाययोजना केली जावी, हा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती मिळणार असून, योजनांचे फायदे अधिक प्रभावीपणे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound