Home क्राईम एरंडोल-कासोदा मार्गावर एस.टी. बस नाल्यात पलटी; १ ठार, ५० जखमी

एरंडोल-कासोदा मार्गावर एस.टी. बस नाल्यात पलटी; १ ठार, ५० जखमी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल-कासोदा मार्गावर शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात घडला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एरंडोल-भडगाव मार्गावरील (MH २० BL ३४०२) क्रमांकाची एस.टी. बस नाल्यात पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात एका प्रवाशाचे दुर्दैवी निधन झाले आहे. तर, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ३५ किरकोळ जखमींवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे एरंडोल-कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound