Home क्राईम गिरणा नदीत अवैध वाळू उत्खनन; ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री जप्त !

गिरणा नदीत अवैध वाळू उत्खनन; ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री जप्त !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावाजवळ गिरणा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन करताना ट्रॅक्टर, लोखंडी वायर रोप व फावडा मशीनसह अवैध वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न जळगाव तालुका पोलिसांनी केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला असून, घटनास्थळी अवैध उत्खननासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दापोरा येथील स्मशानभूमीजवळील गिरणा नदी पात्रात काहीजण ट्रॅक्टर व लोखंडी वायर रोपसह फावडा मशीनचा वापर करून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी ३१ जुलै रोजी पहाटे कारवाई राबवली. मध्यरात्री १.३० वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, अवैध उत्खनन करणाऱ्या व्यक्तींनी पोलिसांना पाहताच पळ काढला.

तरीही पोलिसांनी घटनास्थळी ट्रॅक्टर, लोखंडी वायर रोप व फावडा मशीन हे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिसांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली असून, त्यामुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुषार जोशी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहेत.


Protected Content

Play sound