Home प्रशासन तहसील रावेरमध्ये उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन

रावेरमध्ये उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन


 रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात १ ऑगस्टपासून ७ दिवसांचा महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या काळात महसूल प्रशासनाकडून विविध उपयुक्त आणि लोकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रशासन अधिक पारदर्शक बनवून जनतेच्या समस्या तत्काळ सोडवणे आहे, अशी माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तहसील कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार कापसे यांनी महसूल सप्ताहासाठी आखलेल्या कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा मांडली. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून सप्ताहाची सुरुवात होणार असून, याच दिवशी उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. २ ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमीकरण करण्यात येईल. ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी केली जाणार असून, त्या ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम राबवला जाईल.

४ ऑगस्टला सर्व मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवले जाणार आहे. ५ ऑगस्टला विशेष सहाय योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन थेट अनुदान वितरित केले जाईल. ६ ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जाणार आहे. ७ ऑगस्टला कृत्रिम वाळूच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येईल आणि पर्यायी बांधकाम साहित्याविषयी प्रोत्साहन दिले जाईल.

या सर्व उपक्रमांमुळे महसूल प्रशासन जनतेच्या अधिक जवळ येईल आणि अडचणींचे गतीने निराकरण होईल, असा विश्वास तहसीलदार कापसे यांनी व्यक्त केला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे आणि नायब तहसीलदार आर. डी. पाटील हेही उपस्थित होते.


Protected Content

Play sound