
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी वारीला गेलेली मुक्ताईनगर येथील मुक्ताईची दिंडी पालखी परतीचा प्रवास पूर्ण करून आज बुधवार, ३० जुलै रोजी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली. पालखी शहरात दाखल होताच मुक्ताईनगरवासीयांनी तिचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले.

या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महिला आणि भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती, ज्यामुळे सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली होती. मुक्ताईनगरमधील नवीन मुक्ताई मंदिरातून या भव्य दिंडीला सुरुवात झाली. शहरातून मिरवणूक काढत ही दिंडी पुढे मार्गस्थ झाली.
सायंकाळपर्यंत ही दिंडी कोथळी येथील संत मुक्ताई यांच्या जुन्या मंदिरात पोहोचेल, जिथे दिंडी सोहळ्याचा समारोप होणार आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचा आनंद आणि परतीचा प्रवास यशस्वी झाल्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. मुक्ताई दिंडीच्या आगमनाने मुक्ताईनगरमध्ये भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



