
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील फुफणी भोकर येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध सेवन केल्याने त्यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान रविवारी २७ जुलै रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमवारी २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनीबाई सत्तार बारेला (वय-६०, रा. फुपणी भोकर ता. जळगाव) असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शनीबाई बारेला ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. २७ जुलै रोजी राहत्या घरात त्यांनी उंदीर मारण्याच औषध सेवन केले. त्यामुळे त्यांचे प्रकृती खालावली, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. विषारी औषध सेवन करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे करीत आहे.



