Home क्राईम दहशत माजविणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला जेरबंद; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

दहशत माजविणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला जेरबंद; एमआयडीसी पोलीसांची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार पवन उर्फ बंद्या दिलीप बाविस्कर (वय २५, रा. तुकारामवाडी) याला सम्राट कॉलनीतून एमआयडीसी पोलिसांनी चॉपरसह अटक केली आहे. सम्राट कॉलनीतील एका गल्लीत तो हातात लोखंडी चॉपर घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सोमवारी २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातून हद्दपार केलेला असूनही, संशयित पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर हा सम्राट कॉलनीत पुन्हा सक्रिय झाला होता. हातात धारदार लोखंडी चॉपर घेऊन तो परिसरात दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच, गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, संदीप सपकाळे, विकास सातदिवे आणि योगेश घुगे यांचे पथक तात्काळ सम्राट कॉलनीत रवाना झाले. पोलिसांना बघताच पवन उर्फ बद्या बाविस्कर पळून जाऊ लागला. यावेळी पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि त्याच्याजवळून धारदार चॉपर हस्तगत केले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound