जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक मेंदू आरोग्य दिनाचे औचित्य साधून गोदावरी नर्सिंग कॉलेज, जळगाव येथे ‘खेलो दिमाग से’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मेंदू आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या या अभिनव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यात आला.
या उपक्रमात एम.एस्सी. नर्सिंगच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मेंदूविकासास प्रोत्साहन देणाऱ्या विविध रंजक व सर्जनशील खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट मेंदूच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, गटसंवाद, संघभावना आणि नेतृत्वगुण वाढवणे हे होते. या सर्व गुणांचा समन्वय विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून दाखवून दिला.

कार्यक्रमाला प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मेंदूच्या आरोग्याचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी ताणतणावमुक्त जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे परीक्षण व मूल्यमापन डॉ. प्रियदर्शनी मून आणि प्रा. मालती यांनी अत्यंत बारकाईने केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सर्जिकल नर्सिंग विभागप्रमुख प्रा. मनोरमा कश्यप यांनी कुशल संयोजन करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना प्रा. प्रशिक चौहान आणि प्रा. सुमैया शेख यांची मोलाची साथ मिळाली.
हा उपक्रम केवळ शैक्षणिक उपक्रम मर्यादित राहिला नाही, तर विद्यार्थ्यांमधील सर्जनशील विचार, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणारा ठरला. गोदावरी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. उपस्थित मान्यवरांनीही अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सातत्याने रचना करण्याची गरज व्यक्त केली.



