Home प्रशासन जिल्हा परिषद अखेर खड्डे दुरुस्तीचे काम सुरू

अखेर खड्डे दुरुस्तीचे काम सुरू


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ मार्गावरील आयशानगर वस्तीच्या रस्त्यावर गेल्या सात महिन्यांपासून मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना गंभीर धोका निर्माण झाला होता. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघातही घडले. अखेर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उमेश फेगडे यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत नगर परिषद प्रशासनाला जागे केले आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यास भाग पाडले. ही बातमी स्थानिक जनतेसाठी दिलासादायक ठरत आहे.

यावल शहराच्या आयशानगर वसाहतीजवळील यावल-भुसावळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका वळणावर नगर परिषद प्रशासनाने गटारी स्वच्छतेच्या नावाखाली सात महिन्यांपूर्वी दोन मोठे खड्डे खोदले होते. मात्र, काम पूर्ण न करता ते खड्डे तसेच खुले सोडण्यात आले. यामुळे रस्त्याचा मध्यभागी मोठा अडथळा निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या अभावामुळे अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये कोसळले आणि किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडले.

या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु स्थानिक प्रशासनाकडून सात महिन्यांपासून दुर्लक्षच होत होते. अखेर भाजपचे उमेश रेवा फेगडे यांनी या गंभीर समस्येचा विषय लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत, नगर परिषद प्रशासनाने प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यातील अपघात टळण्यास मदत होईल आणि वाहनधारकांना सुकर व सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, उमेश फेगडे यांच्या पुढाकारामुळेच हे काम लवकर हाती घेण्यात आले, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound