रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाल वन्यजीव क्षेत्रात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. यावल अभयारण्याच्या अंतर्गत गारबर्डी परिसरात अवैध वाळू वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वाळू माफियांना मोठा धक्का ठरली आहे. एका आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई असल्यामुळे परिसरात वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. २३ जुलै रोजी रात्री दरम्यान, यावल अभयारण्यातील पाल वन्यजीव वनपरिक्षेत्रात गस्तीदरम्यान गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक २८ मधील हेंकडझिरा तपासणी नाक्याजवळ एक विना क्रमांकाचा स्वराज ७४२ XT ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना सापडला. ट्रॅक्टरमध्ये कोणतेही कागदपत्रे नसल्याने आणि वाळूचा स्रोत अधिकृत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रॅक्टर तात्काळ जप्त करण्यात आला. संबंधित ट्रॅक्टर सध्या पाल येथील वन कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजित निकत (यावल अभयारण्य) व सहाय्यक वनसंरक्षक मंगेश शर्मा (गस्ती पथक यावल-पाल) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे परिसरात वन विभागाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे.
कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्यासह वनपाल संभाजी सूर्यवंशी, राजनीश घोडके, राजमल बारेला, संजय बारेला, जगदीश बारेला, श्रीमती धनाबाई भादले, कुमारी सकीना तडवी, सविता बारेला यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच, वनमजूर आदिल मन्यार, अमोल चव्हाण, बबलू खान, परमान तडवी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर वाळू तस्करीविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. वन विभागाच्या सशक्त कारवाईमुळे माफियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.



