
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात येत्या ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेच्या भावनेने कार्यक्रम साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आदिवासी समाजबांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे जेष्ठ नेते प्रभाकर आप्पा सोनवणे वढोदेकर हे होते. बैठकीत उत्सवासाठी नियोजन समिती स्थापन करण्यात आली असून नितीन सपकाळे यांची अध्यक्षपदी आणि मुकेश कोळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत आदिवासी समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, जागतिक आदिवासी दिन हा समाजाच्या एकतेचा आणि अस्तित्वाच्या गौरवाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात समाजातील प्रत्येक घटकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. त्यांनी सर्वांना ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बैठकीत ठरवले गेले की, या वर्षीचा कार्यक्रम अधिक प्रभावी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठेवण्यात येईल. पारंपरिक वेशभूषेत रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये विविध सांस्कृतिक देखावे, वाद्यवृंद, नृत्य-नाट्य सादर केले जातील. शिस्तबद्ध पद्धतीने हा दिवस साजरा करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गठीत करण्यात आलेल्या उत्सव समितीत अध्यक्ष नितीन सपकाळे (अंजाळे), उपाध्यक्ष मुकेश कोळी (यावल), खजिनदार विजय सपकाळे (किनगाव), सहखजिनदार खेमचंद कोळी (पाडळसा) अशी निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून आकाश सपकाळे, सुभाष सपकाळे, सागर सोनवणे, डिंगबर कोळी, ताराचंद सोळके, अनिल कोळी, चंदभान सपकाळे, संतोष कोळी, कीरण तायडे, प्रसिद्ध प्रमुख भरत कोळी, गोकुळ कोळी यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीला बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, जितेंद्र सपकाळे, सुभाष सोनवणे, सागर कोळी, समाधान सोनवणे, रामभाऊ सोनवणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कोळी यांनी केले, सूत्रसंचालन खेमचंद कोळी यांनी तर आभार प्रदर्शन किरण कोळी यांनी केले.
एकंदरीत, यावलमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी समाजबांधवांनी केलेली तयारी व नियोजन हे उत्सवाच्या यशस्वीतेचे द्योतक असून आदिवासी समाजाची एकजूट आणि संस्कृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरेल.



