Home राजकीय सर्पमित्रांना मिळणार ‘फ्रंटलाईन वर्कर’चा सन्मान ; १० लाखांचा अपघाती विमा आणि अधिकृत...

सर्पमित्रांना मिळणार ‘फ्रंटलाईन वर्कर’चा सन्मान ; १० लाखांचा अपघाती विमा आणि अधिकृत ओळखपत्र देण्याची तयारी


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता साप पकडणाऱ्या सर्पमित्रांच्या कार्याला शासनाकडून मान्यता मिळण्याची वाट अखेर सुकर झाली आहे. सर्पमित्रांना ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देत त्यांना १० लाख रुपयांचा अपघाती विमा तसेच अधिकृत ओळखपत्र देण्याच्या शिफारशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. ही योजना लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

साप निघाल्यावर नागरिकांमध्ये घबराट उडते. विशेषतः नाग, धामण किंवा इतर विषारी साप घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास तातडीने सर्पमित्रांची आठवण येते. हे सर्पमित्र काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचतात आणि मोठ्या धाडसाने त्या सापाला जिवंत पकडून, तो कोणत्याही प्रकारे इजा न होता नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. या प्रक्रियेत सर्पमित्र आपला जीवही धोक्यात घालतात. आतापर्यंत अनेक घटनांमध्ये सर्पदंशामुळे सर्पमित्रांचा मृत्यू झाल्याचेही नोंदले गेले आहे.

अशा धोकादायक कामात नेहमी तत्पर असणाऱ्या सर्पमित्रांसाठी शासनाने विशेष सन्मानाची योजना आखली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्पमित्रांना ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देण्याची अधिकृत शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, प्रत्येक सर्पमित्राला १० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार असून, त्यांना शासनातर्फे अधिकृत ओळखपत्रही दिले जाईल.

ग्रामीण भागात आणि शहरी भागातील उपनगरांमध्ये सर्पमित्रांची गरज अधिक जाणवते. वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी सर्पमित्रांनी केलेले योगदान फार मोलाचे आहे. या सर्पमित्रांचे प्रशिक्षण, उपस्थिती आणि तत्परता अनेकदा नागरिकांचे प्राण वाचवते. त्यामुळेच शासन आता त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ देणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.

या उपक्रमामुळे सर्पमित्रांना एक वेगळी ओळख आणि सामाजिक सुरक्षा लाभेल. विमा आणि अधिकृत ओळखपत्रामुळे त्यांच्या कार्याची दखल अधिक व्यापक प्रमाणावर घेतली जाईल, आणि नवीन पिढीला सर्पमित्र म्हणून काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.


Protected Content

Play sound