पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील करंजी बुद्रुक (बु.) गावात सरपंच भैय्यासाहेब रोकडे यांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आज महादेव मंदिर परिसर व स्मशानभूमी परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून सरपंच रोकडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून दरवर्षी नित्यनियमाने हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेली झाडे जगतील याची पूर्णपणे काळजी घेणे. भैय्यासाहेब रोकडे आणि ग्रामस्थ लावलेल्या वृक्षांची निगा राखतात, त्यांची देखभाल-दुरुस्ती करतात, ज्यामुळे आज चार वर्षांनंतर ती झाडे डोलताना पाहून गावकऱ्यांना अभिमान वाटतो.

यावर्षी स्मशानभूमी परिसर आणि महादेव मंदिर परिसरात विविध फळांची, वडाची आणि पिंपळाची रोपे लावण्यात आली. नुसती रोपे लावून थांबले नाहीत, तर त्या वृक्षांना जनावरांपासून संरक्षण देण्यासाठी कुंपणासाठी जाळी देखील लावण्यात आली आहे.
या वृक्षारोपण प्रसंगी सरपंच भैय्यासाहेब हिरामण रोकडे, आधार गोवा पाटील, साहेबराव महादू पाटील, बारकू भागचंद माळी यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजी बु. गावातील हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श उदाहरण ठरत असून, इतरांसाठी प्रेरणादायी आहे.



