
चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद वनक्षेत्रात वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल १९ किलो ९१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ३ लाख ९८ हजार आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की., अडावद वनक्षेत्रात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एका मोटारसायकलवर दोन इसम संशयितरित्या जाताना दिसले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याजवळ गांजा असल्याची खात्री पटली. तात्काळ त्यांनी अडावद पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कारवाईसाठी त्यांना घटनास्थळी बोलावले.
नियमानुसार, पंचनामा करण्यासाठी राजपत्रित वर्ग १ च्या अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याने, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्री. अनिल भवारी साहेब यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनामा करण्यात आला. यामध्ये आरोपींसह गांजा आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली.
अडावद वनक्षेत्र येथील वनपाल शितल माळी यांच्या सरकारतर्फे फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघ करत आहेत.
या कारवाईवेळी अडावद पोलीस स्टेशनचे सपोनी वाघ, पोलीस उपनिरीक्षक थोरात, पोलीस हेडकॉन्स्टेबल नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण चव्हाण हे हजर होते. घटनास्थळी सरकारी पंच आणि फॉरेन्सिक व्हॅनला बोलावून सविस्तर पंचनामा करण्यात आला. जप्त केलेला ३ लाख ९८ हजार किमतीचा १९ किलो ९१८ ग्रॅम वजनाचा गांजा सीलबंद करण्यात आला आहे.



