पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| पारोळा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर एका मुलाने अत्याचार केला असून, या अत्याचारातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार समोर येताच तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी ‘सोनू’ नावाच्या मुलावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या पालकांसोबत राहते. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत, पीडित मुलगी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना, तिची पारोळा बसस्थानकावर ‘सोनू’ नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२५ मध्ये घडला होता. त्यानंतर, काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
या गंभीर घटनेने हादरलेल्या पीडित मुलीच्या आईने तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, ‘सोनू’ (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.



