सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील लोहारा गावाजवळ अफवांमुळे उसळलेल्या संतप्त जमावाने हरियाणामधून आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आलेल्या वडील आणि मुलावर जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून, दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सावदा पोलिसांनी अज्ञात १० ते १५ लोकांविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०, रा. सुलतानपुरिया, ता. राणिया, जि. सिरसा, हरियाणा) हे आपल्या २० वर्षीय मुलासह रसलपूर गावात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आले होते. तेथे त्यांनी एका व्यक्तीस औषध दिल्यानंतर त्यांच्याशी वाद निर्माण झाला. वाद टाळण्यासाठी त्यांनी तत्काळ गाडी (स्विफ्ट कार) घेऊन कुसुंबा गावाच्या दिशेने प्रस्थान केले.

दरम्यान, लोहारा गावाजवळ त्यांच्या कारने एका स्थानिक व्यक्तीस सौम्य धक्का दिला. त्यानंतर रागाच्या भरात गावकऱ्यांनी त्या दोघांचा पाठलाग सुरू केला. भीतीने फिर्यादी आणि त्यांचा मुलगा रस्ता चुकून शेत रस्त्यावर गेले व एका शेतात थांबले. मात्र, तेथे आधीच जमा झालेल्या जमावाने त्यांना घेरले आणि लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली.
या घटनेत वडील जस्सानाथ व त्यांचा मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात १० ते १५ आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 115(2), 118(1), 189(1)(2), 191(2), 190, 324(4)(5) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3)/135 अंतर्गत CCTNS क्रमांक 184/2024 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात शांतता आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.



