
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौकात शुभांगी कुणाल नाईक (वय २५) या विवाहितेने शनिवारी (१९ जुलै) दुपारी राहत्या घरात आपली जीवन यात्रा संपविली. नातवाकडे पाहून मुलीला सासरी पाठविले. नंतर त्यांनी तिचा जीवच घेतला. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनीच मुलीला गळफास देऊन मारले असल्याचा गंभीर आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. जोपर्यंत सासरचे लोक येत नाहीत, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शुभांगीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शुभांगीची आई, वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी सासरच्या मंडळींवर प्रचंड रोष व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला.
शुभांगीचे वडील राजेंद्र भागवत वाघ (रा. पिंपळा, ता. सोयगाव) यांनी सांगितले की, “सहा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्यापासून तिला सासरचे मंडळी सतत त्रास देऊन छळ करत होते. तिला माहेरच्या मंडळींशी बोलू देत नव्हते आणि माहेरी येऊदेखील देत नव्हते.” मध्यंतरी सासरच्यांनी शुभांगीला माहेरी आणून सोडले होते, पण चारच दिवसांत तिला परत घेऊन गेले. “तिला होणाऱ्या त्रासामुळे आम्ही तिला पाठवित नव्हतो, मात्र काही जणांनी मध्यस्थी केल्याने पाच वर्षांच्या मुलासाठी मुलीला पाठविले होते,” असे त्यांनी व्यथित होऊन सांगितले. “माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तिला सासरच्यांनीच मारले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
विवाहितेच्या आईने प्रचंड आक्रोश करत, “आमच्या मुलीला आम्ही जिवंत पाठवले होते, ती आम्हाला परत जिवंत मिळाली पाहिजे,” अशी मागणी केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



