Home क्राईम प्रांत अधिकाऱ्यासोबत अरेरावी: दोषींवर कारवाईची यावल पोलीस पाटील संघटनेची मागणी!

प्रांत अधिकाऱ्यासोबत अरेरावी: दोषींवर कारवाईची यावल पोलीस पाटील संघटनेची मागणी!


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथे प्रांत अधिकाऱ्यासोबत झालेल्या अरेरावीच्या घटनेचे पडसाद यावल तालुक्यात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ यावल व रावेर तहसील कार्यालय तसेच सेतू सुविधा केंद्र चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्याचे आदेशित केल्याने, आज (शुक्रवार, १८ जुलै) करण्यात येणारे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. भविष्यातही यावल-रावेर तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालक प्रशासनाच्या पाठीशी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेचा यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथे काही व्यक्तींनी प्रांत अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन करत अरेरावी केली होती. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या आणि अधिकाऱ्याला धमकावण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्गात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने तातडीने बैठक घेऊन या कृत्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. याप्रसंगी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक असून, त्यांच्या कामात अडथळा आणणे किंवा त्यांच्याशी अरेरावी करणे हे अत्यंत निंदनीय आहे. अशा घटनांमुळे प्रशासकीय कामकाजावर नकारात्मक परिणाम होतो आणि शासकीय अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचते.”

यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी अशा गैरकृत्यांना आळा घालणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी, यावल तालुकाध्यक्ष किरण पाटील, यावल तालुका पूर्व विभाग अध्यक्ष विशाल जवरे, जिल्हा संघटक सुरेश खैरनार, गोकुळ संकपाळ, चंदन पाटील, दिनकर कोळी, धर्मराज बाविस्कर, हरीश चौधरी, दीपक पाटील, प्रसन्न कुमार पाटील, संतोष सुरवाडे, प्रफुल्लता चौधरी, विठ्ठल कोळी, प्रियंका पाटील, दिपाली धनगर, अर्चना पाटील, मीना चव्हाण, प्रमोद तावडे, नरेश मासोळे, कैलास बादशहा आदींसह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound