
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील ४८ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १७ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ज्ञानेश्वर शिवदास शेळके वय ४८ रा. चिंचोली ता.जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ज्ञानेश्वर शेळके हे चिंचोली येथे आपली पत्नी आणि मुलासोबत राहत होते. सेंटिंगचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरात कुणीही नसताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ ज्ञानेश्वर शेळके यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी संगिता, मुलगा शेखर आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.



