Home Cities अमळनेर खा. स्मिता वाघ यांना यंदाचा ‘संसद भारती पुरस्कार २०२५’ प्रदान!

खा. स्मिता वाघ यांना यंदाचा ‘संसद भारती पुरस्कार २०२५’ प्रदान!


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  ‘सी.एस.आर. टाईम्स’ या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘संसद भारती पुरस्कार २०२५’ जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रदान करण्यात आला आहे. लोकसभेतील त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि मतदारसंघात केलेल्या सामाजिक योगदानाला यामुळे अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे.

१५ जुलै रोजी नवी दिल्ली येथे आयोजित १२व्या राष्ट्रीय सी.एस.आर. संमेलनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला, हा क्षण अत्यंत प्रेरणादायी आणि स्मरणीय असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले. ‘विकसित भारत मिशन २०२७ मध्ये सी.एस.आर. ची भूमिका’ या विषयावर आधारित या संमेलनात देशभरातील धोरणकर्ते, उद्योजक, सी.एस.आर. क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ‘सी.एस.आर. टाईम्स’ संस्थेने प्रथमच राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला ‘संसद भारती पुरस्कार’ प्रदान केला आहे. संसदेमध्ये थेट निवडून आलेल्या एका महिला खासदारास हा सन्मान मिळणे, हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. संसदेतील सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेली भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची सखोल दखल घेऊन श्रीमती वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार स्वीकारताना खासदार स्मिता वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “सी.एस.आर. टाईम्स संस्थेच्या या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे, सहकाऱ्यांच्या अखंड सहकार्यामुळे आणि वेळोवेळी नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला आहे.”

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या सर्व नेत्यांचे आभार मानले. या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून जबाबदारी दिली, तसेच सन्मानप्राप्तीच्या मार्गावर सातत्याने प्रेरणा, मार्गदर्शन आणि विश्वास दर्शवला, असेही खासदार वाघ यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound