जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या पर्यटन आणि कृषी-आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकासातील संधी, आव्हाने आणि त्यावरील उपायांSवर सखोल चर्चा झाली. तसेच, कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनांवरही भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान हतनूर धरण, गिरणा नदीकाठ, गिरीशिखर आणि इतर निसर्गरम्य पर्यटन स्थळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा, स्वच्छता, पर्यटकांसाठी माहिती केंद्रे, बोटिंग आणि नैसर्गिक ट्रेल्स यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठा हातभार लागणार आहे.

कृषी उद्योगाच्या वाढीसाठी शेतमाल प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी (Cold Chain) यंत्रणा, साठवणूक सुविधा आणि स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठेशी जोडणाऱ्या मार्केट लिंकेज प्रणालीवर भर देण्याचे ठरले. निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी पर्यटन विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, स्थानिक उद्योजक आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. तसेच, स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून आणि कृषी उद्योगातील नवउद्योजक म्हणून प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, “जळगावचा समृद्ध निसर्ग आणि कृषी वारसा ही आपली मोठी ताकद आहे. याचा सुनियोजित वापर करून जिल्ह्यात रोजगार निर्मिती, व्यवसाय वाढ आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे.”



