Home क्राईम पाडळसे परिसरात वाघाच्या हल्ल्याने भीतीचं सावट; वन विभागाचं अपयश

पाडळसे परिसरात वाघाच्या हल्ल्याने भीतीचं सावट; वन विभागाचं अपयश


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाडळसे आणि परिसरात वाघाच्या सतत वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघाने शेतात व गोठ्यांवर हल्ले करून पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटना घडत असून, वन विभागाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून, आता अधिक कडक पावलं उचलण्याची मागणी होत आहे.

पाडळसे परिसरात काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये सतत भीतीचं वातावरण आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत एक म्हैस आणि एक शेळी मृत्युमुखी पडली आहे. भोरटेक गावात गुरांच्या गोठ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी सापळे लावले, ट्रॅप कॅमेरे बसवले, पथक तैनात केलं, मात्र सर्व उपाय अपयशी ठरले.

काल संध्याकाळी येशील बाळू यादव हे त्यांच्या शेळ्यांना चरण्यासाठी नेले असता, एका शेळीवर वाघाने अचानक हल्ला करून तिला ठार मारलं. ही घटना डोळ्यादेखत घडल्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीती आणखी वाढली आहे. रात्री शेतात जाणं तर दूरच, अनेकांनी संध्याकाळनंतर घराबाहेर पडणं देखील बंद केलं आहे.

शाळकरी मुलांचं संरक्षण हा देखील एक मोठा प्रश्न झाला आहे. पालकांच्या मते, “शाळा सकाळी असल्या तरी वाटेवर वाघ भेटल्यास काय करायचं?” अशी चिंता सतावत आहे. काही शेतकरी दिवसभराची शेतीची कामं सकाळी लवकर आटोपून घरी परततात, तर काहींनी शेतात जाणं बंद केलं आहे.

वन विभागाकडून अद्याप ठोस कृती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे. “वाघाला लवकरात लवकर पकडलं नाही, तर मोठं आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे. वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, ग्रामस्थांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

संपूर्ण पाडळसे परिसरात वाघाच्या हालचाली आणि हल्ल्यांमुळे भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून वाघाला जेरबंद करावं, ही नागरिकांची तीव्र मागणी आहे.


Protected Content

Play sound