Home क्राईम पाल येथे वन विभागाची धडक कारवाई: ट्रॅक्टरसह वाळू तस्कर अटकेत

पाल येथे वन विभागाची धडक कारवाई: ट्रॅक्टरसह वाळू तस्कर अटकेत


 रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल अभयारण्यातील पाल परिसरात वन विभागाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत स्थानिक वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. सुकी नदी पात्रातून चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या टोळीवर छापा टाकत, ट्रॅक्टरसह एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून, पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दि. १२ जुलै रोजी वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पाल परिमंडळातील कक्ष क्रमांक ५४ मधील सुकी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचे समजले. यावरून वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शब्बीर बलदार तडवी (वय ४५) या आरोपीस ट्रॅक्टर (MH-19 BG 6930) व वाळू भरलेल्या ट्रॉलीसह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई म. उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक सत्यजीत निकत (यावल अभयारण्य), मंगेश शर्मा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये वनपाल संभाजी सूर्यवंशी, प्रविण पाटील, वनरक्षक रोहिदास पाटील, जगदीश बारेला, संजय बारेला, रणधीर काटे, राजमल बारेला, सविता बारेला, सकिना तडवी, धनाबाई भादले आणि वनमजूर परमान तडवी, युसूफ खान यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

पाल जंगल परिसर हा गेल्या काही काळात वाळू तस्करीसाठी कुख्यात ठरत चालला आहे. मात्र वन विभागाने वेळोवेळी केलेल्या कारवायांमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नुकतीच झालेली ही कारवाई वाळू माफियांमध्ये घबराट पसरवणारी ठरली असून, स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी याचे स्वागत करत अशा कारवायांचे नियमित आयोजन व्हावे, अशी मागणी केली आहे.

या कारवाईमुळे पाल परिसरातील बेकायदेशीर वाळू तस्करीच्या हालचालींना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे पर्यावरण रक्षणासाठीचा लढा अधिक मजबूत झाला आहे.


Protected Content

Play sound