यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण ‘व्यासोनारायण भगवान की जय’ च्या जयघोषाने दुमदुमले होते. मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेला होता, तर विविध गावांतून आलेल्या दिंड्यांनी शहरात एक धार्मिक उत्सवाचे दृश्य निर्माण केले होते.
सकाळी ८ ते १० या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा पार पडली. या पूजेचा मान स्वप्निल सुरेश फेगडे व सौ. रिंकू फेगडे, संतोष गोपाळ पाटील व सौ. उर्मीला पाटील, हृतिक राजेंद्र महाजन व सौ. दीपाशा महाजन या भाविक दांपत्यांना लाभला. पूजेनंतर मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुले करण्यात आला. या वेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरातील सर्व धार्मिक विधी ब्रह्मवृंद पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.

दुपारी व संध्याकाळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथे ११ क्विंटल बुंदी आणि २१ क्विंटल तांदळाच्या तिखट मसाले भाताचा महाप्रसाद ‘काळा हनुमान मित्र मंडळा’च्या वतीने भाविकांना वितरित करण्यात आला. मंदिर परिसरात भाविकांची संख्या लक्षात घेता सुमारे १०० स्वयंसवेकांनी व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, अनिल साळुंके, सारीका वाणी, मिनाक्षी तडवी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सुरळीत बंदोबस्त राखला.
या उत्सवासाठी यावल शहरात आणि परिसरातील गावांमधून आलेल्या भाविकांची गर्दी लक्षवेधी ठरली. मंदिरात सुरळीत दर्शन आणि प्रसाद वितरण झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसून आले. देवदर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तीमय आनंद झळकत होता.



