Home Cities पाचोरा पाचोरा पिपल्स बॅंकेच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण ; १३ जुलै रोजी मतदान

पाचोरा पिपल्स बॅंकेच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण ; १३ जुलै रोजी मतदान


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दि. पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, येत्या १३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार भवन पाचोरा येथे ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

यंदाची निवडणूक एकूण १५ जागांसाठी होत असून, त्यापैकी सहकार पॅनलचे ६ उमेदवार आधीच राखीव मतदार संघातून बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ९ जनरल जागांसाठी निवडणूक होणार असून, यात सहकार पॅनलचे ८ उमेदवार आणि निलेश विनायकराव मराठे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार पॅनलने प्रयत्न केले, मात्र निलेश मराठे यांनी आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे निवडणूक प्रक्रिया अनिवार्य झाली आहे.

१३ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, एकूण १०,९५८ सभासद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ७ ठिकाणी एकूण २१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये केंद्र क्र. १ ते १४, न्यु इंग्लिश स्कूल (भडगाव रोड) येथे केंद्र क्र. १५ व १६, सरदार एस. के. पवार हायस्कूल (नगरदेवळा) येथे केंद्र क्र. १७, जिल्हा परिषद मराठी शाळा (शेंदुर्णी) येथे केंद्र क्र. १८, को. ऑफ फ्रूट अ‍ॅग्री प्रॉडक्ट सेल (जामनेर) व कन्या विद्यालय वाकी रोड (जामनेर) येथे केंद्र क्र. १९ व २०, तसेच सौ. सु. ग. देवकर प्राथमिक शाळा (जिल्हा पेठ, जळगाव) येथे केंद्र क्र. २१ असे मतदान केंद्र असणार आहेत.

मतदानासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १४ वैध ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सोबत आणणे मतदारांसाठी अनिवार्य आहे. मतदानानंतर १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, ती स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवन, पाचोरा येथे पार पडेल. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहील, अशी माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, पारदर्शक व शांततेत निवडणूक पार पडावी यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.


Protected Content

Play sound