Home Cities जळगाव खाजगी इंग्रजी शाळांच्या शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह; मनसेने केली ‘ही’ मागणी !

खाजगी इंग्रजी शाळांच्या शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह; मनसेने केली ‘ही’ मागणी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनसेने या प्रकरणी एक स्वतंत्र आणि विशेष समिती नेमून सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबेल आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. शिक्षण शुल्क म्हणून हजारो रुपये उकळणाऱ्या या शाळांमध्ये ५ ते १० हजार रुपयांवर विनापदवीधर कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून नेमले जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करावी आणि स्कूल व्हॅन चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन व्हावे, अशा मागण्यांचे निवेदन मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.

मनसेच्या म्हणण्यानुसार, शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शाळांची तपासणी होते खरी, पण त्या तपासणीत शिक्षकांची पात्रता, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि इतर आवश्यक बाबी खरोखरच तपासल्या जातात का, याबाबत मोठा संशय आहे. जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये शिक्षक हे पदवीधर नसल्याचे मनसेच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण संस्थाचालक विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये शैक्षणिक शुल्क घेतात, पण त्यांना शिकवण्यासाठी मात्र कमी पगारात अपात्र कर्मचारी नेमतात, ही गंभीर बाब आहे.

या पार्श्वभूमीवर, मनसेने संपूर्ण जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याची मागणी केली आहे. तसेच, शिक्षकेतर आणि इतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची शैक्षणिक पात्रताही तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मनसेने या प्रकरणी एक स्वतंत्र आणि विशेष समिती नेमून सर्व खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्याची मागणी केली आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबेल आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकांनीही आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देताना शिक्षकांच्या पात्रतेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound