जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील एका मुकादमाला साखर कारखान्यासाठी मजूर पुरवठा करताना मोठा धक्का बसला आहे. मजुरांना ॲडव्हान्स देण्यासाठी आणलेल्या ५ लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये वाटप केल्यानंतर, उर्वरित अडीच लाखांची रोकड मजुरांनीच चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तक्रार घेत नसल्याने, त्रस्त झालेल्या मुकादमाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून कैफियत मांडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंतवाडी तांडा येथील मुकादम साखर कारखान्यासाठी मजूर घेऊन जात होते. त्यांनी मजुरांना ॲडव्हान्स म्हणून आपल्याजवळील ५ लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये वाटले. त्यानंतर, उर्वरित अडीच लाखांची पैशांची बॅग येथीलच काही मजुरांनी चोरून नेल्याचे मुकादमाच्या निदर्शनास आले.

या गंभीर प्रकाराची तक्रार देण्यासाठी मुकादम पारोळा पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथील पोलीस निरीक्षकांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. पोलिसांकडून दाद मिळत नसल्याने, मुकादमाने आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पारोळा पोलीस ठाण्याला फोन करून, मुकादमाची तक्रार नोंदवून घेण्याचे आणि योग्य तपास करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या तात्काळ हस्तक्षेपामुळे मुकादमाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, त्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.



