मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहर आधीच विविध समस्यांनी त्रस्त असताना, काल प्रभाग क्रमांक १३ मध्ये एक धक्कादायक घटना घडली. अवैध वाळूने भरलेल्या डंपरमुळे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बांधलेला गटारीवरील धापा पूर्णपणे कोसळला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या एका महिन्यापासून या धाप्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद होता. नागरिकांना रस्ता सुरू होण्याची प्रतीक्षा असतानाच, वाळू डंपरमुळे तो पूर्णपणे तुटून गेल्याने रहिवाशांची गैरसोय आणखी वाढली आहे. अवैध वाळू उपसा आणि मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि डंपरमुळे शहरातील रस्त्यांची आणि नागरिकांच्या राहण्याची आधीच दुरवस्था झाली आहे.

या घटनेला जबाबदार कोण, कंत्राटदार की अवैध वाळू तस्कर, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात कर भरूनही चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या प्रकारामुळे मुक्ताईनगरमधील समस्यांमध्ये आणखी भर पडली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.



