जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नियतीने एक क्रूर डाव साधला आणि एका मातेच्या आयुष्यात न भरून येणारा अंधार पसरला. जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात राहणाऱ्या २४ वर्षीय रामेश्वर लक्ष्मण भोई या तरुणाने मंगळवारी, ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, पंढरपूरहून परतलेल्या त्याच्या आईसमोरच त्याच्या निष्प्राण देहाचे सत्य समोर आले, आणि या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी सात वाजता ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रामेश्वरची आई, मंगलाबाई भोई, पांडुरंगाच्या भेटीसाठी काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भेटण्याच्या ओढीने त्या घरी परतल्या. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आईच्या समोर मुलगा रामेश्वर याने गळफास घेतल्याचे भयाण दृश्य दिसले. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आईने केला.

रामेश्वर आणि त्याची आई हे दोघेच एकमेकांचा आधार होते. रामेश्वर हा केळकर मार्केटमधील एका कापड दुकानावर कामाला होता. आई पंढरपूरला गेली असल्याने रामेश्वर घरी एकटाच होता. सोमवारी, ७ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे कामाला गेला आणि सायंकाळी घरी परतला. त्यानंतर मध्यरात्री त्याने घरातील छताला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
रामेश्वरच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याच्या अकाली जाण्याने मंगलाबाईंच्या आयुष्यात आता केवळ रिकामेपणा आणि असीम दुःख उरले आहे. ज्या मुलासाठी त्या जगल्या, तोच आता त्यांच्यासोबत नाही, या वास्तवाने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. रामेश्वरच्या पश्चात आई आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



