मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक या भारतातील अग्रगण्य बँकांचा एस&पी ग्लोबल मार्केट इन्टिलेजन्सच्या 2025 च्या जगातील टॉप 100 सर्वात मोठ्या बँका या यादीत समावेश झाला आहे. मालमत्तेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीत स्थान मिळवणाऱ्या या दोनच भारतीय बँका असून, त्यांनी जागतिक पातळीवर आपली दमदार उपस्थिती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.



एस&पीच्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली कामगिरी सुधारत चार स्थानांची झेप घेत 43व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. तर एचडीएफसी बँकेनेही एक स्थान वर सरकत 73वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे भारतीय बँकिंग क्षेत्राचा आत्मविश्वास बळकट झाला असून, जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. ही यादी बँकांच्या एकूण मालमत्तेच्या आधारावर तयार केली जाते आणि ती जगभरातील बँकांच्या आकारमानाचे व ताकदीचे प्रतिबिंब दर्शवते. यामध्ये आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, इत्यादी खंडांतील प्रमुख बँकांचा समावेश असतो.
एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या जागतिक क्रमवारीतील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे भारतीय बँकिंग क्षेत्रातील वाढ आणि सामर्थ्य अधोरेखित होते. आज जागतिक बँकिंग क्षेत्र विलिनीकरण आणि पुनर्रचनेच्या प्रक्रियेतून जात असताना, भारतीय बँका त्यात आघाडीवर आहेत हे या यादीतून स्पष्ट होते. हे स्थान केवळ आर्थिक बळकटीचेच नव्हे तर धोरणात्मक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन, आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाचेही द्योतक आहे.


