जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२५ च्या निमित्ताने बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची माहिती ओंकार नगरातील हॉटेल कन्हैया कुंज येथे बुधवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


यंदाचा परशुराम जन्मोत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यात येणार असून, ढोल-लेझीम प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन, रक्तदान शिबिर, भगवान परशुराम मूर्तीचे तालुक्यांमध्ये वितरण, विराट मोटरसायकल रॅली, देणगीदारांचा सन्मान, परशुराम दूत गौरव पुरस्कार, अभिषेक, पूजन, रथ पूजन, शोभायात्रा आणि जाहीर व्याख्यान यांसारख्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
या उपक्रमांची माहिती बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ही संस्कृतिक पर्वणी साजरी होणार असून, समाजातील विविध घटकांचा सहभाग या निमित्ताने वाढविण्याचा आमचा उद्देश आहे. कार्यक्रमांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून, विशेषतः युवकांमध्ये भगवान परशुरामांच्या कार्यप्रेरणेची भावना जागविण्यासाठी हे आयोजन उपयुक्त ठरणार आहे, असे खटोड यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील परशुराम भक्तांना मूर्तीचे वितरण करण्यात येणार असून, त्यामुळे ग्रामीण भागातही उत्सवाचे वातावरण तयार होईल.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विराट मोटरसायकल रॅली व रथ पूजनासह भव्य शोभायात्रा, ज्यात पारंपरिक वेशभूषा, ढोल, ताशे, लेझीम आदींचा सहभाग असेल. याशिवाय, रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकीची जाणिव समाजात निर्माण केली जाणार आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवाचे हे उत्सवमंडळ सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम ठरणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


