जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने भूमी विभागात विविध सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पूर्वी पारंपरिक पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवा आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये “मोजणी वर्जन टू” ही नवीन सुविधा महत्त्वपूर्ण ठरली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात न जाता 100% ऑनलाईन पद्धतीने मोजणी करून नकाशा प्राप्त करता येईल.
ऑनलाईन मोजणी प्रक्रियेचे टप्पे:
अर्जदाराने मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. चालान अर्जदाराला ऑनलाईन स्वरूपात मिळेल, ते ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज भरल्यानंतर अर्जदाराला एसएमएसद्वारे मोजणीची तारीख कळवली जाईल. निर्धारित दिवशी अर्जदाराने आपल्या जागेवर उपस्थित राहावे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला जाईल. हा नकाशा भविष्यातील कायदेशीर व इतर आवश्यक कामांसाठी उपयोगात आणता येईल. यापूर्वी प्रत्येक प्रक्रियेसाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागे. मात्र, आता डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ही आवश्यकता राहिलेली नाही. विशेषतः दुर्गम भागातील आदिवासी व वस्तीवरील नागरिकांसाठी ई-सेवा केंद्र मोठ्या मदतीचा ठरत आहेत. तालुका व गाव पातळीवर सेतू सुविधा केंद्रांप्रमाणेच तांड्यांमध्येही ई-सेवा केंद्र कार्यरत झाली आहेत. त्यामुळे आता जवळच्या ई-सेवा केंद्रातूनही नागरिक ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना वेळ आणि श्रम वाचतील तसेच प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :