Home राजकीय विधानसभेत गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी

विधानसभेत गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या चर्चेदरम्यान मंत्री पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सभागृहातील वातावरण अधिक तापवले.

आदित्य ठाकरे यांनी चर्चा सुरू असताना मंत्र्यांनी अभ्यासपूर्वक उत्तरं द्यावीत असा टोला लगावला. यावर मंत्री गुलाबराव पाटील भडकले आणि त्यांनी, “माझा अभ्यास आहे, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला हे खातं दिलं होतं,” असे प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच खसखस पिकली. ठाकरे गटाच्या आमदारांनी याला जोरदार आक्षेप घेतला आणि वातावरण आणखी तापले.

पाणीपुरवठा आणि कृषी विषयक चर्चेदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील उत्तर देत होते. याचवेळी आदित्य ठाकरे मध्येच बोलू लागले. यावर मंत्री पाटील यांनी त्यांना थांबवत, “तुम्ही शांत बसा,” असे म्हटले. यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला आणि विरोध दर्शवला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचे आदेश दिले.

आदित्य ठाकरे यांनी टोला लगावत म्हटले, “काहीही विचारलं की मंत्री लगेच केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. त्यांना खातं कळतंय की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.” यावर गुलाबराव पाटील यांनी पलटवार करत स्पष्ट शब्दांत सांगितले, “मला खातं कळतं, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला हे खातं दिलं होतं.” त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले, “म्हणूनच तुम्ही पळून गेलात.”

यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही वैयक्तिक टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला आणि हा विषय रेकॉर्डवर न घेण्याचे स्पष्ट केले.

या वादानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे गुलाबराव पाटील आता शिंदे गटात असून त्यांनी ठाकरे गटावर अशी टीका करणे हे राजकीय उलथापालथीचे स्पष्ट लक्षण मानले जात आहे. विधानसभेत घडलेली ही घटना आगामी राजकीय समीकरणांवर कसा परिणाम करेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 


Protected Content

Play sound