Home Cities पारोळा तुलसी बाजरा बियाणे संदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे निवेदन

तुलसी बाजरा बियाणे संदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे निवेदन


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रावरून तुलसी सिड प्रा.लि. कंपनीचे टीबीएच हायब्रीड बाजरा 405 बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. वाण घेतेवेळी शेतकऱ्यांना प्रती बॅग 22 क्विंटल उत्पादन येईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 1 क्विंटल उत्पादनही मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांच्याकडे अर्ज दाखल केला असून न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, पारोळा येथील सागर ट्रेडर्स, अमळनेर नाका या कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या तुलसी 405 वाणाच्या बाजरीला कनसेही फुटले नाहीत. काही ठिकाणी कनसांना अत्यंत कमी प्रमाणात दाणे आढळले. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा संशय आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्र चालकाकडे तक्रार केली. मात्र, कंपनीचे अधिकारी टोलवा-टोलवी करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेने या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंचायत समिती पारोळा येथे शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. हे निवेदन पंचायत समितीतील कृषी अधिकारी बी.बी. बोरसे, कृषि विस्तार अधिकारी संदीप पाटील आणि डी.एन. मोरे यांनी स्वीकारले. संबंधित वाणाची मोक्का तपासणी करून पंचनामा केला जाणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound