पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील जलसा हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता घडली.
राजेंद्र भिका पाटील (वय ४३, रा. बोदर्ड, ता. पारोळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दुचाकीने (एमएच १९ बीआर ०१६३) पारोळ्याकडून धुळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने (एमएच १५ जेडब्ल्यू २६९५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप व्हॅन चालक वाहन घेऊन पसार झाला. याप्रकरणी मयत राजेंद्र पाटील यांचे भाऊ संजय पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.



