चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा, जळगाव आणि धरणगाव तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील महत्त्वपूर्ण खेडीभोकर-भोकर पूल पूर्णत्वास नेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी २० कोटी रुपयांच्या निधीच्या तातडीने वितरणाचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांसाठी मोठी वाहतूक सुविधा निर्माण होणार आहे.
१५० कोटींच्या पुलासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर
८८४ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि २७ मीटर उंच असलेल्या या पुलाच्या उभारणीसाठी एकूण १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांनी ५०:५० टक्के खर्चवाटप तत्त्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे. यातील ७५ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले असून, उर्वरित ७५ कोटींच्या खर्चाची जबाबदारी जलसंपदा विभागाने घेतली आहे. या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
अजून ३६.३३ कोटी निधीसाठी पाठपुरावा सुरू
पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा खर्च १०२.६६ कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे ३६.३३ कोटी रुपयांची अतिरिक्त गरज निर्माण झाली. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आवश्यक असलेल्या ३६.३३ कोटींपैकी २० कोटी निधी तत्काळ वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांत समाधान
या निधीच्या मंजुरीमुळे धरणगाव, चोपडा आणि जळगाव तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. वाहतूक सुलभ होईल, परिणामी व्यापारी वर्गाचा व्यवसायही वाढेल. या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानले आहेत. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत बोरकर, अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.