जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावाजवळील गोदावरी हॉस्पिटलच्या समोर भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाने कट मारल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची सविस्तर माहिती अशी की, गोपाल राजू कुंभार (वय 25, रा. नशिराबाद, जळगाव) हे आपल्या पत्नी हर्षाली गोपाल कुंभार आणि आई शोभाबाई राजकुमार कुंभार यांच्यासोबत दुचाकी (क्रमांक MH 19 CT 1914) वरून नशिराबाद येथून वरणगावकडे खाजगी कामासाठी जात होते. दुचाकीवर ते तिघे ट्रिपल सीट प्रवास करत असताना, मागून भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षा (क्रमांक MH 19 CW 4864) ने अचानक कट मारला. या अचानक झालेल्या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेच्या संदर्भात, सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. रिक्षा चालक संतोष गौतम बाविस्कर (रा. पिंपराळा घोडके, जळगाव) याच्याविरुद्ध अपघातास जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.


