Home क्राईम नाशिक येथे ‘आयएसआय’साठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला अटक

नाशिक येथे ‘आयएसआय’साठी हेरगिरी करणाऱ्या जवानाला अटक


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून तीन मोबाईल फोन जप्त केले असून, त्याद्वारे त्याने आयएसआयला गुप्त लष्करी माहिती पुरवली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप सिंहने लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे. या बदल्यात त्याने विविध माध्यमांतून सुमारे १५ लाख रुपये घेतले असल्याचे उघड झाले आहे. २०१५ मध्ये सैन्यात भरती झालेला संदीप सिंह हा पंजाबमधील पटियालामधील सरदुलगडचा रहिवासी आहे. त्याने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांची गुप्त माहिती गोळा केली आणि ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानला पाठवली. या माहितीमध्ये छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रांची माहिती, तसेच लष्करी अधिकाऱ्यांच्या तैनातीसंबंधी तपशील समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे.

आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर पटियालाला गेला असताना, घरिंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला अटक केली. चौकशीत संदीपने अनेक धक्कादायक गुपिते उघड केली आहेत. आरोपीच्या मोबाईल फोनची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. यापूर्वी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपाल सिंहलाही आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपी संदीप सिंहने फिरोजपूरमधील एका निर्जन ठिकाणी अमृतपालला २ लाख रुपये दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अमृतपालचा सहकारी राजबीर सिंह नाशिक कॅन्टोन्मेंटमधून पळून गेला असून, त्याच्या शोधासाठी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या हेरगिरी प्रकरणाचे धागेदोरे उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Protected Content

Play sound