

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाविद्यालयातून टहाकळी येथे जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दुचाकीच्या भीषण अपघातात उपचारादरम्यान शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश संजय पाटील वय-१८, रा. टहाकळी ता.धरणगाव असे मयत झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील टहाकळी या गावात महेश हा आपले आई-वडील आणि मोठी बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अर्थात एनएमकेसी या महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी २३ जानेवारी रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर महेश हा घरी जाण्यासाठी पायी निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या गावात राहणारे प्रभाकर नामदेव पाटील वय-४२ हे देखील कंपनीतून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी रस्त्यामध्ये महेश भेटल्यावर त्याला देखील दुचाकीवर बसवून घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली. या धडकेत महेश हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता प्राणज्योत मालविली. दरम्यान एकुलता एक मुलगा केल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.


