चोपड्यातल्या कॉलनी भागातील रस्ते बनले मृत्यूचा सापळा

chopda roads

चोपडा प्रतिनिधी । येथील शिरपूर रस्त्यालगतच्या अग्रसेन नगर, शिव कॉलनी, सर्वोदय कॉलोनी व इतर कॉलनी भागातील रस्ते जणू मृत्यूचा सापळा बनले आहेत. यामुळे प्रशासन अपघात होऊन जीव जाण्याची वाट पाहतेय का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होतो आहे.

शहरातल्या कॉलनी परिसरात मागील आठवड्यात नवीन पाणीपुरवठा साठी पाईप टाकण्याचे काम सुरू होते. नगरपालिकेच्या वतीने यासाठी जेसीबी च्या साहाय्याने सदर पाईप टाकले गेले. पण बुजवताना मात्र वर आलेल्या काळ्या मातीचा थर व्यवस्थित रस्त्याच्या कडेला टाकला गेला नाही. परिणामी लगेच आलेल्या पावसामुळे या काळ्या मातीच्या चिखलाचे साम्राज्य सर्व रस्त्यांवर पसरले. रस्त्यावर पसरलेल्या या काळया मातीच्या चिखलामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे अशक्य होत असून मोटर सायकल, सायकल यांच्या चाकात चिखल अडकून गाड्या रस्त्यातच रुतून पडत आहेत. लहान बालकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, महिलांना, वृद्धांना चालतानाही पाय निसटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे रस्ते सध्या मृत्यूचे सापळे बनलेले आहेत.

दरम्यान, नेमके पावसाळ्याच्या तोंडावरच सदरचे खोदकाम कसे केले गेले? आणि केलेच तर खोदकामानंतर काळ्या मातीची योग्य ती विल्हेवाट का लावली गेली नाही? याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अग्रसेन नगर, सर्वोदय कॉलनी, कॉलनी परिसरात आधीच पक्क्या रस्त्यांची कमतरता होती त्यातच जेमतेम वापरासाठी असलेल्या कच्च्या रस्त्यांवर सुद्धा अशी परिस्थिती उदभवली. यामुळे अनेकांना तर आपली वाहने आपल्या घरापर्यंत नेणे सुद्धा अशक्य झाले होते. म्हणून पुढचा पाऊस येण्याआधी प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करून रस्ते चालण्यायोग्य बनवावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Protected Content