भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील ४२ वर्षीय अंकुश रमेश विसपूते हे गावाला जात असल्याचे सांगून ८ जानेवारी रोजी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद रविवारी, १९ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निंभोरा बुद्रुक येथील अंकुश विसपूते हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. ८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता ते “भुसावळला जाऊन येतो” असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी अंकुश यांचा परिसरात आणि इतर ठिकाणी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, ११ दिवसांनंतर कुटुंबीयांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अंकुश विसपूते यांची बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय कखरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. अंकुश यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी तपासणी करत आहेत.